बेळगाव लाईव्ह : मराठी माध्यमाच्या शाळांना बळ देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावने अनगोळ येथील शासकीय मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 34 दत्तक घेतली आहे. यानिमित्त रोटरॅक्ट क्लब आणि शाळेदरम्यान सामंजस्य करारावर (MOU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या उपक्रमामागे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांचा शैक्षणिक अनुभव समृद्ध करणे आणि शासकीय व खासगी शाळांमधील दरी कमी करण्याचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभर विविध शैक्षणिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
क्लबचे अध्यक्ष हर्षित कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रकल्पामागील उद्देश स्पष्ट केला. प्रकल्प अध्यक्ष अनिकेत जाधव यांनी मराठी माध्यमाच्या शाळांमधील घटती प्रवेशसंख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या शाळा बंद होण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले.

मराठी भाषा आणि तिचा वारसा जपण्यासाठी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे जाधव यांनी सांगितले.
या प्रकल्पांतर्गत ‘विद्या, विकास, कला, आरोग्य, परिसर आणि सहभाग’ या सहा प्रमुख क्षेत्रांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या कलागुणांना आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यावरही भर दिला जाणार आहे.
“ही केवळ सुरुवात असून आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातील,” असे अनिकेत जाधव यांनी सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना गाडगीळ यांनी रोटरॅक्ट क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले. शाळेची निवड केल्याबद्दल त्यांनी क्लबचे आभार मानले.
यानंतर रोटरॅक्ट क्लब आणि शाळेच्या प्रतिनिधींनी MOU वर स्वाक्षऱ्या करून सहकार्याची औपचारिक सुरुवात केली. यावेळी क्लबतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. हे शैक्षणिक किट रोनक पाटील यांच्या प्रायोजकत्वातून देण्यात आले.
क्लबचे सचिव रोहित अनगोळकर यांनी आभार मानले. शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या सहकार्याबद्दल तसेच उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या क्लबच्या सर्व सदस्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा मिरजकर यांनी केले.
यावेळी चिन्मयेन्द्र आर्या, सिद्धांत भोसगी, श्रेयस सुनगार, ओंकार मनवाडकर, दर्शन दोशी, अन्वेष नाईक, श्रीधर जोशी यांच्यासह रोटरॅक्ट क्लबचे सदस्य आणि शाळेचे प्रतिनिधी उपस्थित होते.





