बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारने बेळगाव विभागासाठी जाहीर केलेल्या ८३१ शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत केवळ कन्नड माध्यमासाठीच शिक्षकांची भरती करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अधिसूचनेत मराठी, उर्दू तसेच इतर अल्पसंख्याक माध्यमांसाठी शिक्षक भरतीचा उल्लेख नसल्याने मराठी भाषिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
यासंदर्भात युवा नेते शुभम शेळके यांनी सहकाऱ्यांसह जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयाला भेट देऊन माहिती घेतली. जिल्हा शिक्षण अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी कार्यालय अधीक्षक सलीम नदाफ यांची भेट घेतली. सदर भरती अधिसूचना सध्या केवळ कन्नड माध्यमासाठी असल्याची माहिती नदाफ यांनी दिल्याचे शेळके यांनी सांगितले.
मराठी माध्यमातील शिक्षकांच्या भरतीकडे वारंवार दुर्लक्ष झाल्यास मराठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच उर्दू आणि इतर अल्पसंख्याक भाषिक विद्यार्थ्यांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता शेळके यांनी व्यक्त केली.

याप्रकरणी बंगळुरूहून डीडीपीआय अधिकारी येणार असून त्यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आहे. शिक्षक भरतीची अधिसूचना तातडीने दुरुस्त करून मराठी, उर्दू आणि इतर माध्यमांसाठीही शिक्षकांच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, या मागणीसाठी उद्या सकाळी ठीक ११ वाजता जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षणप्रेमी आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शुभम शेळके यांनी केले आहे.यावेळी युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, मनोहर हुंदरे आदी उपस्थित होते.
प्रमुख मागण्या :
- ८३१ शिक्षक भरती अधिसूचना तातडीने दुरुस्त करावी.
- मराठी व इतर माध्यमासाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा समावेश करावा.
- सर्व भाषिक विद्यार्थ्यांना संविधानानुसार समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून द्याव्यात.





