belgaum

मराठीच्या सन्मानासाठी एकत्र; राज्यभर संयुक्त जनजागृती अभियानाची घोषणा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्रितपणे लढा उभारण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग) आणि मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या पदाधिकाऱ्यांची मीरारोड येथील मध्यवर्ती कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभर व्यापक जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग)च्या शिष्टमंडळाने मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठी भाषा, संस्कृती, मराठी अस्मिता, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तसेच सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांवर सविस्तर चर्चा झाली.

मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य ही गेल्या १० ते १२ वर्षांपासून महाराष्ट्रभर मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. तर सीमाभागातील मराठी बांधव गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ लोकशाही मार्गाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या न्याय्य तोडग्यासाठी संघर्ष करत आहेत. या दोन्ही संघटनांची उद्दिष्टे समान असल्याने भविष्यात अधिक समन्वयाने आणि व्यापक पातळीवर काम करण्याबाबत एकमत झाले.

 belgaum

बैठकीत सीमाभागातील मराठी अस्मितेचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्यभर जनजागृती, संघटनबांधणी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून व्यापक लोकचळवळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील मराठी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संयुक्तपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग)चे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील आणि सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी बैठकीत सहभाग घेतला. दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात राज्यव्यापी जनजागृती अभियान राबवून मराठी समाजाला संघटित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

बैठकीत “मराठीचा सन्मान, सीमाभागाचा न्याय आणि अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान” हा सामायिक ध्यास घेऊन लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात मराठी समाजाच्या प्रश्नांवर राज्यभर संयुक्त उपक्रम आणि जनआंदोलने राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.