बेळगाव : पावसामुळे बेळगाव तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या संपर्क रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात घडत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात येणार आहे.
यासाठी गुरुवार, दिनांक २० रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयात निवेदन देण्याचे समितीने नियोजन केले आहे.
बेळगाव तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे निर्माण झाले असून, वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आला असल्याने त्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी व आवश्यक दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात येणार आहे.
शासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदन देण्याच्या कार्यक्रमाला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण व घटक समितीचे सदस्य, युवा आघाडी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, विठ्ठल पाटील आणि मोनाप्पा पाटील यांनी केले आहे.





