बेळगाव लाईव्ह : शहरातील सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून सुरेश मुनिस्वामी जालगार (वय 41, रा. कपिलेश्वर मंदिरामागे, जालगार गल्ली, बेळगाव) याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश जालगार हा सन 2005 पासून आपल्या साथीदारांसह मारामारी, लुटमार, जुगार तसेच बेकायदेशीर जमाव करून शस्त्रास्त्रे बाळगणे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे. त्याच्याविरुद्ध बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्यानंतरही त्याच्या बेकायदेशीर कारवाया सुरूच राहिल्याचा आरोप आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले.

कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने आणि भविष्यातही तो धोकादायक कृत्ये करू शकतो, या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी कर्नाटक पोलीस कायदा कलम 55(अ) अंतर्गत 18 ऑगस्ट 2026 रोजी सुरेश जालगार याला बेळगाव शहरातून हद्दपार करण्याचा आदेश जारी केला.
दरम्यान, समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या किंवा बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.





