belgaum

भाषेच्या भिंती ओलांडून कुगजी दाम्पत्याचा मदतीचा हात

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : जात, धर्म आणि भाषेच्या भिंती बाजूला ठेवून गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या हणमंत कुगजी आणि त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांनी माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे. जमखंडी येथील कन्नड साहित्यिक देशपांडे यांच्या पत्नी वैभवी व्ही. देशपांडे यांच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी कुगजी दाम्पत्याने २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

वैभवी देशपांडे यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार असून, त्यासाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यांच्या उपचाराची माहिती मिळताच हणमंत कुगजी आणि उज्वला कुगजी यांनी देशपांडे कुटुंबीयांची भेट घेतली आणि उपचारासाठी २५ हजार रुपयांची मदत सुपूर्द केली.

विशेष म्हणजे देशपांडे हे कन्नड भाषिक साहित्यिक आहेत. मात्र, भाषा, जात किंवा धर्माचा कोणताही भेद न करता कुगजी दाम्पत्याने मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि माणुसकीच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 belgaum

हणमंत कुगजी यांनी यापूर्वीही अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे. येळ्ळूर येथील किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या एका मुलीच्या उपचारासाठीही त्यांनी आर्थिक मदत केली होती. तसेच कोरोना काळात गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, औषधे आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले होते.

सामाजिक कार्यात पत्नीची खंबीर साथ

हणमंत कुगजी यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांची नेहमीच खंबीर साथ राहिली आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून पुढे आलेल्या कुगजी यांनी गरजूंच्या अडचणी जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळे शक्य असेल तेव्हा गरजूंच्या मदतीसाठी पुढे येण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

भाषा, जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीला प्राधान्य देणाऱ्या कुगजी दाम्पत्याने कन्नड साहित्यिकाच्या कुटुंबाला केलेली ही मदत सामाजिक सलोखा आणि एकतेचा सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.