belgaum

न्यायाधीशांच्या वर्तनाविरोधात वकिलांचे आंदोलन;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : न्यायाधीशांकडून वकिलांशी करण्यात येणाऱ्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने गुरुवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत निदर्शने करण्यात आली. विशेषतः क्रमांक २ जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या वर्तनाबाबत वकिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. जे. गंगाई यांनी सांगितले की, संबंधित न्यायालयात वकिलांशी सहकार्य न करणे, उद्धटपणे बोलणे आणि वकिलांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत.

कालच्या घटनेत प्रशिक्षणार्थी पीएसआय अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी वकिलांना त्यांच्या खुर्च्यांवरून उठवण्यात आल्याचा आरोप वकिलांनी केला. वकिलांच्या बसण्याच्या जागेसह साक्षीदार आणि नागरिकांच्या सुविधांबाबत न्यायालयीन नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही गंगाई यांनी सांगितले.

 belgaum

वकिलांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित नियमांची कागदपत्रे दाखवूनही त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी आज सर्व न्यायालयांच्या कामकाजावर बहिष्कार टाकत निषेध नोंदवला.

बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षांची प्रतिक्रिया
“वकिलांचा अपमान करणे, त्यांच्यावर दबाव आणणे किंवा न्यायालयात दुजाभावाची वागणूक देणे आम्ही सहन करणार नाही. या प्रकरणाची माहिती मुख्य जिल्हा न्यायाधीशांना दिली आहे. आता हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय न्यायाधीशांकडे नेणार असून, संबंधित न्यायाधीशांची तात्काळ बदली करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे.”

वकिलांच्या या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला असून, पुढील काळात या प्रकरणी काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.