belgaum

गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण रस्ते दुरुस्त करा;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्थेबाबत विविध मागण्या घेऊन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली. यावेळी रस्त्यांची दुरवस्था, गणेशोत्सव मंडळांना सुविधा आणि तात्पुरत्या वीज जोडणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण बेळगाव तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून आवश्यक डागडुजी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी समितीने केली. तालुक्यातील अनेक गावांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना आणि गणेशभक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे समितीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ज्या सवलती व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, त्याच सुविधा ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच गणेशोत्सवाचे आयोजन करणाऱ्या युवक मंडळांना तात्पुरती वीज जोडणी मोफत देऊन त्यासाठी कोणतीही सुरक्षा ठेव आकारू नये, अशी मागणीही समितीने केली.

 belgaum

पावसाळा संपल्यानंतर दसरा आणि दिवाळीच्या सुमारास गावातील रस्त्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण व काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी समितीने केली. ही कामे रखडल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही शिष्टमंडळाने दिला.

दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवून आवश्यक डागडुजीची कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. ज्या गावांमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, अशा गावांची यादी समितीने प्रशासनाकडे सादर करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यानुसार संबंधित विभागांच्या समन्वयाने आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

गणेशोत्सव मंडळांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी आकारण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेवीच्या धोरणाचाही आढावा घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यावेळी माजी आमदार मनोहर किनेकर, समितीचे आर. एम. चौगुले यांच्यासह शिष्टमंडळातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.