बेळगाव लाईव्ह : बेळगाव उत्तर मतदारसंघात पडलेले खड्डे बुजवून परिसर खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी ‘खड्डेमुक्त बेळगाव’ उपक्रम सुरू केला आहे. मतदारसंघातील विविध भागांमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्षभरात चाललेली एल अँड टी ची कामे आणि सध्या सुरू असलेल्या युजीडीच्या कामांमुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या सर्व संबंधित यंत्रणांना प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे, जेणेकरून रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करता येईल.
या उपक्रमाचा भाग म्हणून तक्रारींवर वेगाने कारवाई करण्यासाठी आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे.

नागरिक आपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो किंवा व्हिडिओ लोकेशनसह ८७२२५५९५६१ आणि ९०३५७८६५१८ या व्हॉट्सॲप क्रमांकांवर पाठवू शकतात.
आमदार आसिफ सेठ यांनी नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले असून, प्राप्त तक्रारींची पडताळणी करून तातडीने दुरुस्ती केली जाईल असे स्पष्ट केले आहे. सर्व नागरिकांनी मिळून बेळगाव शहर खड्डेमुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.





