belgaum

कल्लेहोळ क्रॉसवर स्पीड ब्रेकरसाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : रक्षाबंधनासाठी भावासोबत माहेरी जात असताना कल्लेहोळ क्रॉसजवळ झालेल्या अपघातात बेळवट्टी येथील रेखा महेश हरगुडे (वय ३८) यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्लेहोळ क्रॉस येथे तातडीने स्पीड ब्रेकर, रम्बल स्ट्रिप्स आणि आवश्यक रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत स्मार्ट कल्लेहोळ फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. कल्लेहोळ क्रॉस हे राकसकोप रोडवरील महत्त्वाचे ठिकाण असून या मार्गावरून ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वार आणि अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र, चौकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी पुरेशा उपाययोजना नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या अपघातात बेळवट्टी येथील रेखा हरगुडे या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे भाऊ महेश कलखांबकर हेही जखमी झाले होते.

 belgaum

या दुर्घटनेची दखल घेत स्मार्ट कल्लेहोळ फाउंडेशनने जिल्हा प्रशासनाकडे कल्लेहोळ क्रॉसचा तातडीने संयुक्त रस्ता सुरक्षा पाहणी करून घेण्याची मागणी केली आहे. तसेच चौकाच्या दोन्ही बाजूंना नियमानुसार स्पीड ब्रेकर व रम्बल स्ट्रिप्स बसवाव्यात, ‘हळू वाहन चालवा’, ‘अपघातप्रवण क्षेत्र’, ‘पुढे चौक’ तसेच वेगमर्यादेचे फलक लावावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत अपघातांचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह मार्किंग, दिशादर्शक व इतर आवश्यक सुरक्षा साधनेही बसविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

‘आणखी एका दुर्घटनेची वाट पाहू नका’

कल्लेहोळ क्रॉसवरील धोका आता केवळ संभाव्य राहिलेला नसून नुकत्याच झालेल्या जीवघेण्या अपघातामुळे तो प्रत्यक्षात समोर आला आहे. आणखी एका दुर्घटनेनंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका फाउंडेशनने मांडली आहे.

स्मार्ट कल्लेहोळ फाउंडेशनचे अधिकृत प्रतिनिधी निलेश मुतगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर केले. निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, वाहतूक पोलीस विभाग, तहसीलदार, संबंधित रस्ता प्राधिकरण तसेच संबंधित ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.