बेळगाव लाईव्ह: ‘बेळगाव हे मराठी संस्कृती आणि भाषिक अस्मितेचे महत्त्वाचे केंद्र आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळ सीमाभागातील मराठी संस्था आणि मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,’ अशी ग्वाही बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्लीचे अध्यक्ष दिलीप कुंभोजकर यांनी दिली. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते भावूक झाले. बेळगावकरांनी केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुंभोजकर यांनी प्रथमच बेळगावला अधिकृत भेट दिली. या निमित्ताने मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव यांच्या वतीने रविवारी (३० ऑगस्ट) सकाळी भव्य सत्कार व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील मराठी संस्थांच्या एकजुटीचे दर्शन या सोहळ्यातून घडले.
कार्यक्रमाचे नियोजन मराठी भाषा प्रेमी मंडळाचे अध्यक्ष प्रा. अनिल चौधरी आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचे सह-कोषाध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे कर्नाटक प्रांत विभागीय कार्यवाह परशराम माळी यांची विशेष उपस्थिती होती. ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ प्रा. आनंद मेणसे प्रमुख अतिथी, तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता नाडगौडा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार रवी माळशेट यांच्यासह विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ईशस्तवन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कु. स्वराली हिने गणपती आराधनेवर सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर मराठी भाषा प्रेमी मंडळाच्या वतीने दिलीप कुंभोजकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
या वेळी बेळगावातील विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही कुंभोजकर तसेच अन्य मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान केला. त्यामुळे सीमाभागातील मराठी संस्थांची एकजूट आणि परस्परांतील बंधुभाव अधोरेखित झाला.

प्रास्ताविकात प्रा. अनिल चौधरी यांनी बेळगावातील मराठी भाषिक चळवळीची पार्श्वभूमी मांडली. तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सीमाभागाला मिळणाऱ्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. आनंद मेणसे आणि प्रा. दत्ता नाडगौडा यांनी सीमाभागातील मराठी शिक्षण संस्था आणि भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कुंभोजकर यांनी आपल्या मनोगतात सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तरुण कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच स्व. प्रदीप कुलकर्णी यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन केले.
श्रीमती नीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आयोजक समितीचे बापूसाहेब देसाई, कुमार पाटील आणि प्रभाकर हलगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. उत्साहपूर्ण वातावरणात हा सत्कार व स्नेहमिलन सोहळा पार पडला.





