बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका २० वर्षीय तरुणाचा पाण्याच्या तीव्र प्रवाहात अडकून बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कडाबगट्टी गावाच्या हद्दीत असलेल्या घट्टी बसवण्णा मंदिराच्या परिसरात रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव तालुक्यातील मळवंकी गावातील रहिवासी राहुल बसवराज कापसी (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. राहुल हा दररोज कडाबगट्टी गावाजवळून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीवर पोहण्यासाठी जात असे.
रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहत असताना पाण्याच्या वेगामुळे तो प्रवाहात खेचला गेला आणि खोल पाण्यात बुडाला.
या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. तरुण नक्की कोणत्या परिस्थितीमुळे बुडाला, याचे कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.





