belgaum

१६० कोटींच्या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणात एक आरोपी अटकेत;

0
Tilakwadi police station
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सुमारे १६० कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणात टिळकवाडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. APPEXX BIZCORP LLP या ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून तीन हजारांहून अधिक लोकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कौजलगी, ता. गोकाक येथील अशोक वीरुपाक्षी बिसगुप्पी (वय ४३) यांनी १३ जुलै २०२६ रोजी टिळकवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनुसार, बेळगावातील मंगळवार पेठ येथील रेणुका रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये APPEXX BIZCORP LLP ही ट्रेडिंग कंपनी चालवली जात होती. या कंपनीच्या माध्यमातून तीन हजारांहून अधिक लोकांकडून सुमारे १६० कोटी रुपये गुंतवून घेतल्याचा आरोप आहे.

 belgaum

गुंतवणूकदारांना अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून पैसे स्वीकारण्यात आले. त्यानंतर ही रक्कम शेअर बाजार आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवून तसेच विविध स्थावर मालमत्ता खरेदी करून पैशांचा गैरवापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी टिळकवाडी पोलिस स्थानकात गुन्हा क्रमांक ८५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. BUDS Act, KPI(D) Act तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एक आरोपी न्यायालयासमोर

या प्रकरणातील आरोपी क्रमांक ६ अर्जुन महादेव वाघमारे (वय ३६, रा. मांगणूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला बंगळुरू येथील XCII Additional City Civil and Sessions Court (CCH-93) न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूकदारांकडून स्वीकारलेल्या रकमेबाबत पुढील तपास केला जात आहे.

पोलिस आयुक्त, बेळगाव शहर, उपपोलिस आयुक्त तसेच खडेबाजार विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलिस स्थानकाचे निरीक्षक परशुराम एस. पूजेरी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कारवाई केली.

तपास पथकात PSI विश्वनाथ घंटामठ यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि टेक्निकल सेलचे कर्मचारी सहभागी होते. तपास पथकाच्या कामगिरीचे पोलिस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, १६० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराबाबत तसेच फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची नेमकी संख्या याबाबतचा पुढील तपशील पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.