बेळगाव लाईव्ह : वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई देवीचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू झाला. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी वडगावमध्ये गर्दी केली. बेळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि गोव्यातूनही मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी दाखल झाले आहेत.
यात्रेनिमित्त गेल्या महिनाभरापासून वडगावमध्ये सोडण्यात आलेला ‘वार’ मंगळवारी सकाळी १० वाजता पारंपरिक पूजा-विधी करून उतरविण्यात आला. या धार्मिक विधीनंतर यात्रोत्सवाला विधिवत सुरुवात झाली.
श्री मंगाई देवीच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भक्तिमय वातावरणात भाविक देवीचे दर्शन घेत असून, संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे.
यात्रेनिमित्त खासबाग येथील बसवेश्वर सर्कल परिसरात कोंबड्यांच्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आली आहेत. यात्रेदरम्यान विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असून, दरवर्षी या यात्रेत कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यंदाही मोठी आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून श्री मंगाई देवीची परिसरात मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी यात्रेला बेळगावसह महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो भाविक आवर्जून उपस्थित राहतात. यंदाही यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला असून, वडगाव परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.





