belgaum

तिलारीचे पाणी बेळगावला? पालकमंत्र्यांचे आश्वासन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : तिलारी नदीचे अतिरिक्त पाणी राकसकोप्प जलाशयाद्वारे बेळगाव शहराला वळविण्याच्या प्रस्तावासंदर्भात पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

मंगळवारी माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी नगरसेवक दीपक वाघेला आणि माजी ए पी एम सी अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन तिलारी पाणी प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी माजी नगरसेवक संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली. तिलारी नदीचे अतिरिक्त पाणी राकसकोप्प जलाशयाच्या माध्यमातून बेळगावला आणल्यास शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होऊ शकते, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.

 belgaum

“माजी नगरसेवक संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत केलेला पाठपुरावा आणि तिलारीचे अतिरिक्त पाणी बेळगावला वळविण्याच्या प्रस्तावाची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांना दिली. त्यांनी सर्व माहिती ऐकून घेतली असून, पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावू. तसेच कर्नाटक सरकारच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करू,” असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी दिली.

दरम्यान, या प्रस्तावासाठी माजी नगरसेवक संघटनेने यापूर्वीही पाठपुरावा केला आहे. मागील आठवड्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली होती. त्यानंतर खासदार शेट्टर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तिलारीचे अतिरिक्त पाणी बेळगावकडे वळविण्याच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

तिलारी नदीचे अतिरिक्त पाणी राकसकोप्प जलाशयाद्वारे बेळगावला उपलब्ध झाल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे या प्रस्तावाच्या पुढील कार्यवाहीसाठी होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.