बेळगाव लाईव्ह : सावगाव गावातील गायरान तसेच इतर सरकारी जमिनींचे सार्वजनिक वापरासाठी संरक्षण करावे आणि या जागेवर कोणताही नवीन प्रकल्प उभारण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी सावगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सावगाव गावातील सर्व्हे क्रमांक 135/1, 238, 129, 149, 132, 135 आणि 153 या क्षेत्रातील दोन एकरांहून अधिक सरकारी जागेचा वापर ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून जनावरांच्या चराईसाठी, गो-स्मशानासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा उपक्रमांसाठी केला जात असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या सरकारी जागेवर शासनाकडून काही प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या जागेवर प्रकल्प उभारल्यास गावातील जनावरांना चराईसाठी जागा उपलब्ध होणार नाही, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
तसेच सदर जागा धरणालगत असल्याने येथे कचरा अथवा इतर प्रकारचा प्रकल्प उभारण्यात आल्यास त्यातून निर्माण होणारे दूषित पाणी धरणाच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरणासह परिसरातील जनावरे आणि नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
त्यामुळे संबंधित सरकारी जमीन कोणत्याही खासगी अथवा इतर कारणासाठी हस्तांतरित किंवा वापरात बदल करू नये. गावाच्या सार्वजनिक गरजांसाठी ही जागा कायमस्वरूपी राखून ठेवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
बेनकनहळ्ळीचे माजी चेअरमन यल्लाप्पा पाटील यांच्यासह सावगाव ग्रामस्थ आणि माजी सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रस्तावित प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.





