belgaum

येडुरप्पा रोडवरील खड्डे तातडीने बुजवा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : हालगा, अलारवाड, बस्तवाड, कोंडस्कोप, मास्तमर्डी, तेरहाळ, शगणमट्टी, शिंदोळी, बसरिकट्टी आदी गावांतील कामगार, शेतकरी व नागरिकांच्या वतीने जुना पी.बी. रोड अर्थात येडुरप्पा मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जुने बेळगाव नाका ते अलारवाड अंडरब्रिज सर्कल या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, पावसामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या मार्गाचा दररोज हजारो कामगार, शेतकरी व नागरिकांकडून बेळगाव शहर, वडगाव तसेच इतर भागात ये-जा करण्यासाठी वापर केला जातो.
रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनधारकांचा वाहनावरील ताबा सुटून लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, रस्ता लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास येत्या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदन देणाऱ्या नागरिकांनी दिला आहे.
यावेळी अॅड. आण्णासाहेब घोरपडे, अॅड. शरद देसाई , रवळनाथ नलवडे, प्रशांत पाटील, महेंद्र कांबळे, अॅड. स्नेहा लाड-घोरपडे, माजी चेअरमन सदानंद बिळगोजी, सागर कामानाचे किशोर चौगुले,  ऍड चंद्रकांत काकडे, बाळू जायानाचे यांच्यासह विविध गावांतील कामगार, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.