बेळगाव लाईव्ह : गोकाक शहरात आज पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांवर एकाचवेळी छापे टाकले. डीवायएसपी रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत सीपीआय श्रीशैल बाकोड, गोकाक शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण मोहिते, ग्रामीण पीएसआय के. वालिकर यांच्यासह अंकलगी आणि कूळगोड पोलीस ठाण्यांचे पीएसआय, एएसआय तसेच सुमारे ३५ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
गोकाक शहरातील काडू सिद्धेश्वर मठ परिसर, उपारगळी, जलालगळी, जैनबस्ती यांसह विविध भागांमध्ये पोलिसांनी कारवाई केली. सहा रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांची पोलिसांकडून झडती घेण्यात आली.
घरांमध्ये शस्त्रे, अमली पदार्थ तसेच सावकारी व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आहेत का, याची पोलिसांनी तपासणी केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घरांमधील विविध वस्तू आणि कागदपत्रांची पाहणी केली.
पहाटेच्या या अचानक कारवाईमुळे गोकाक शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या मोहिमेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.





