बेळगाव लाईव्ह : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून आदरांजली वाहण्यात आली. नाना पाटेकर यांचे मराठा लाईट इन्फंट्रीशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि ‘प्रहार : द फायनल अटॅक’ या चित्रपटातील त्यांची भूमिका यांची आठवण रेजिमेंटने व्यक्त केली.
‘प्रहार’ चित्रपटासाठी नाना पाटेकर यांनी बेळगाव येथे तीन वर्षे कठोर लष्करी प्रशिक्षण घेतले होते. या चित्रपटात त्यांनी मेजर व्ही. एस. चव्हाण यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयातून मराठा सैनिकांचे शौर्य, शिस्त आणि देशसेवेची भावना प्रभावीपणे चित्रित झाली होती.
नाना पाटेकर यांचे मराठा लाईट इन्फंट्रीशी असलेले नाते केवळ चित्रपटापुरते मर्यादित नव्हते. रेजिमेंटमधील अधिकारी आणि जवानांशी त्यांनी आपुलकीचे संबंध जपले होते. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान लष्करी जवानांसोबत त्यांनी केलेल्या सेवेचाही उल्लेख रेजिमेंटने केला आहे.

मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल आणि रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या.
‘प्रहार’मधील मेजर व्ही. एस. चव्हाण यांच्या भूमिकेतून मराठा सैनिकांचे शौर्य आणि परंपरा प्रभावीपणे सादर करणारे नाना पाटेकर यांची आठवण रेजिमेंटच्या परिवारात कायम राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.





