बेळगाव लाईव्ह : शहरातील हॉटेल, बार, क्लब आणि पबमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात बेळगाव शहर पोलिसांनी १० ऑक्टोबरच्या रात्री विशेष मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान शहरातील सुमारे ६० आस्थापनांवर छापे टाकून तपासणी करण्यात आली. या प्रकरणांत संबंधित मालक आणि व्यवस्थापकांविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान मद्यविक्री आणि मद्यसेवनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन तसेच निर्धारित वेळेनंतर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर आणि साऊंड सिस्टिमचा वापर केल्याच्या कथित प्रकारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले.
या प्रकरणांत कर्नाटक पोलीस कायदा, उत्पादन शुल्क कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहरात बेकायदेशीर कृत्ये आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती मिळाल्यास पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा किंवा ११२ या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावर कळवावे, असे आवाहन बेळगाव शहर पोलिसांनी केले आहे.





