बेळगाव लाईव्ह : मार्केट यार्ड परिसरातील ज्योतीनगर मेन रोडवर एपीएमसीच्या भिंतीलगत कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे साचल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून, परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे.
या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून जाण्याची वेळ आली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला असून, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषतः सायंकाळी सातनंतर परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरातून शाळकरी मुलेही ये-जा करत असल्याने त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टॅक्स भरतो, मग कचरा का उचलला जात नाही?
महानगरपालिकेला नियमितपणे कर भरूनही आपल्या परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
“महानगरपालिकेला आम्ही टॅक्स भरतो, मग आमच्या भागातील कचरा का उचलला जात नाही?” असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अधिकारी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येतात; मात्र पाहणी केल्यानंतरही कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार होतात.

अंधाराचा फायदा घेत कचरा टाकला जातो?
कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणावरील स्ट्रीटलाईट बंद असल्याने रात्री आणि पहाटेच्या वेळी अंधाराचा फायदा घेत काहीजण येथे कचरा टाकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमित स्वच्छता करण्यासोबतच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ज्योतीनगर मेन रोडवरील कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवून कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था, परिसरात प्रकाश व्यवस्था आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.
“कर भरूनही स्वच्छता मिळत नसेल, तर नागरिकांनी तक्रार कुठे करायची?” असा सवाल आता ज्योतीनगरमधील नागरिक उपस्थित करत आहेत.





