बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मुतगा गावच्या ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवीच्या यात्रेत खोबऱ्याची आगळीवेगळी धार्मिक परंपरा आजही शेकडो वर्षांपासून अखंडपणे जपली जात आहे. देवीच्या ओटीत नारळाऐवजी केवळ खोबरे अर्पण केले जाते आणि मंदिरासमोर खोबरे अग्नीस अर्पण करण्याची प्रथा या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य मानली जाते.
याबाबत ग्रामपंचायत माजी अध्यक्ष उमेश पुरी यांनी सांगितले की, गावातील लक्ष्मी देवीचा मान श्री भावेश्वरी देवीला दिला जात असल्यामुळे या यात्रेत नारळाऐवजी खोबऱ्याचा वापर करण्याची परंपरा आहे. वर्षातून एकदाच होणाऱ्या या यात्रेत भाविक देवीच्या चरणी खोबरे अर्पण करून मंदिरासमोर अग्नीस अर्पण करतात.
श्री भावेश्वरी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असून, नवस पूर्ण झाल्यानंतर अनेक भाविक देवीला कोंबडे व बकरे दान म्हणून अर्पण करतात. ही परंपराही अनेक पिढ्यांपासून श्रद्धेने पाळली जात आहे.

या यात्रेसाठी कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून मोठ्या संख्येने भाविक मुतगा गावात दाखल होतात. विशेष म्हणजे मुतगा गाव आणि खानापूर तालुक्याचे अनेक शतकांपासूनचे कौटुंबिक व सामाजिक संबंध असल्याने खानापूर तालुक्यातील भाविकांची उपस्थितीही लक्षणीय असते.
यात्रेच्या आयोजनासाठी देवस्थान समिती, गाव सुधारणा मंडळ, ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभत असून, भाविकांनी शिस्त राखून दर्शन घ्यावे, असे आवाहन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष उमेश पुरी यांनी केले आहे.





