belgaum

मुतगा ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी यात्रेला उत्साहात प्रारंभ

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मुतगा गावची ग्रामदेवता श्री भावेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेला आज (शुक्रवार) पहाटेपासून धार्मिक वातावरणात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. पारंपरिक विधी, पूजा-अर्चा आणि भाविकांच्या उपस्थितीत यात्रेच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला.

यात्रेनिमित्त आज सकाळी गावातील सर्व मंदिरांमधील देवी-देवतांची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर श्री भावेश्वरी मातेच्या मूर्तीची विशेष पूजा करून ती मंदिरात आणण्यात आली. गावातील परंपरेनुसार हक्कदार असलेल्या आठ घराण्यांनी देवीची ओटी भरून ती देवीला अर्पण केली. हा धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.

श्री भावेश्वरी देवीची यात्रा ही मुतगा गावातील अनेक पिढ्यांपासून जपली गेलेली परंपरा असून, यात्रेपूर्वी महिनाभर विविध धार्मिक विधी आणि व्रतांचे पालन केले जाते. यात्रेदिवशी गावासह परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात.

 belgaum

यात्रेनिमित्त देवस्थान समिती, गाव सुधारणा मंडळ, ग्रामपंचायत, युवक मंडळ आणि ग्रामस्थांनी भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, वाहतूक नियंत्रण तसेच पार्किंगची सुविधा हायस्कूल व मराठी शाळेच्या मैदानात उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

गावचे देवस्थान पंचकमिटी सदस्य भाऊ पाटील यांनी भाविकांना आवाहन करताना सांगितले की, “भावेश्वरी देवीची यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी चारचाकी व दुचाकी वाहने गावाबाहेरील पार्किंगमध्ये उभी करावीत तसेच पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.”

तर देवस्थान पंचकमिटीचे हेमंत पाटील यांनी यात्रेच्या परंपरेची माहिती देताना सांगितले की, “भावेश्वरी देवीची ही यात्रा पूर्वापार चालत आलेली आहे. देवीच्या ओटीमध्ये नारळ न घालता पारंपरिक पद्धतीने वाटी-कोपरे अर्पण करण्याची प्रथा आहे. सर्व भाविकांनी या परंपरेचे पालन करूनच ओटी भरावी. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, देवस्थान समिती आणि सर्व स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत.”

संध्याकाळपर्यंत आणि उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, यात्रेचे सर्व धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने संपन्न होणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.