belgaum

पावसात खड्ड्यांचा त्रास, आता डिव्हायडरही ठरतोय जीवघेणा!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरातील आठले गल्ली कॉर्नर, एसपीएम रोड येथे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरचा भाग तुटल्याने त्यामधील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित ठिकाणाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले यांनी केली आहे.

याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार कल्पना देण्यात आली असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख मार्गांपैकी असलेल्या एसपीएम रोडवर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा ठिकाणी तुटलेल्या डिव्हायडरमधून बाहेर आलेल्या लोखंडी सळ्या वाहनचालकांसाठी मोठा धोका ठरत आहेत.

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत डिव्हायडरमधून बाहेर आलेल्या लोखंडी सळ्या म्हणजे अपघाताला थेट आमंत्रण देणारी बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 belgaum

विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यास या सळ्या सहजपणे दिसून येत नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच पादचारी यांना गंभीर दुखापत होण्याचा धोका अधिक वाढला आहे. एखाद्या वाहनाचा तोल जाऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

महापालिका प्रशासनाने केवळ तक्रारींची दखल घेण्यापुरते मर्यादित न राहता अशा धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे डोळेझाक न करता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोणतीही जीवितहानी किंवा मोठा अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आठले गल्ली कॉर्नर येथील तुटलेल्या डिव्हायडरची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले यांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.