बेळगाव लाईव्ह : कागदावर आणि जाहिरातींमध्ये ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात बेळगाव आघाडीवर असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात बेळगाव शहरातील वस्तुस्थिती अतिशय विदारक आणि संतापजनक दिसून येत आहे.
एका बाजूला विकासाचा मोठा पाढा वाचला जात असताना, प्रत्यक्षात मात्र विकासाच्या नावाखाली जनतेच्या कष्टाच्या पैशांचा अक्षरशः अपव्यय केला जात असल्याचे दिसून येत आहे. विकासाची केवळ स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात जनतेच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू असल्याचा संताप बेळगावकरांकडून व्यक्त होत आहे.
राज्यभरात मोठ्या गाजावाजा करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी आणि विकासाच्या दाव्यांची पोलखोल थेट प्रशासकीय कार्यालयांच्या दारातच होते. पावसाळा सुरू झाला की, शहरातील प्रमुख रस्ते खड्ड्यांचे साम्राज्य आणि चिखलाचे आगार बनतात. विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी पाठीशी असलेल्या तालुका पंचायत कार्यालयाच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
दररोज शेकडो नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत कार्यालयांमध्ये कामानिमित्त येत असतात; परंतु याच मुख्य मार्गावर आढळून येणारे खड्डे, चिखल आणि साचलेले पाणी यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. एकीकडे जिल्हाधिकारी इमारतीचे नूतनीकरण करून ती चकचकीत केली गेली आहे, तर दुसरीकडे तिच्याच बाहेरील रस्त्याची अशी दुर्दशा असणे म्हणजे प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड करणारी बाब आहे.
दुसरीकडे, न्यायालय परिसर ते आरटीओ सर्कलपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कामांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. एल अँड टी कंपनीने रस्त्यांचे अनेक ठिकाणी केलेले खोदकाम वेळेत व व्यवस्थित पूर्ववत न केल्यामुळे संपूर्ण रस्ता अक्षरशः उखडला गेला आहे.

पादचाऱ्यांसाठी चालण्यासाठी कोणतीही सुरक्षित जागा किंवा फुटपाथ उपलब्ध नसल्याने, त्यांना वाहनांच्या प्रचंड गर्दीतून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने वेगाने जात असल्याने पादचारी आणि वाहनांच्या धडकेत मोठे अपघात घडण्याची भीती बळावली आहे.
कोणत्याही शाश्वत नियोजनाशिवाय आणि वैज्ञानिक अभ्यास न करता मनमानी पद्धतीने राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांमुळे बेळगावकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या या भोंगळ आणि पोकळ कारभारावर आता नागरिक आणि विविध स्तरांतून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासन, पालिका आणि संबंधित यंत्रणा कधी जागी होणार? रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली जाईल का? आणि जनतेच्या पैशांची होत असलेली ही उधळण कधी थांबणार? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असून, यावर कायमस्वरूपी उपाय कधी मिळणार याकडे संपूर्ण बेळगावकरांचे डोळे लागून राहिले आहेत.





