बेळगाव लाईव्ह :
खानापूर तालुक्यातील लोकोळी क्रॉस–तोपिनकट्टी मार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबाचा आधारच हिरावून घेतला. दुचाकीवरून बेळगावच्या दिशेने निघालेल्या बाप-लेकाला अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात 23 वर्षीय मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या वडिलांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने लक्केबैल आणि लोकोळी परिसरावर शोककळा पसरली आहे.
या दुर्दैवी अपघातात पुंडलिक अशोक नांदुरकर (23, रा. लक्केबैल) आणि त्यांचे वडील अशोक नांदुरकर (60) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिक आणि त्यांचे वडील अशोक हे दोघे सोमवारी सकाळी दुचाकीवरून काही कामानिमित्त बेळगावच्या दिशेने निघाले होते. सकाळी सुमारे सातच्या सुमारास लोकोळी क्रॉस–तोपिनकट्टी मार्गावरील एका वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, पुंडलिक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील अशोक नांदुरकर हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली.
कामावर जाणाऱ्या बाप-लेकाचा प्रवास ठरला अखेरचा
पुंडलिक हे उद्यमबाग परिसरात नियमितपणे कामासाठी जात होते. तर अशोक नांदुरकर हे गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. रोजच्या कामासाठी घराबाहेर पडलेला बाप-लेकाचा हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा ठरला. काही तासांच्या अंतरात मुलगा आणि वडील दोघांनाही गमावल्याने नांदुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

धडक देणारा टेम्पोचालक पसार
अपघातानंतर दुचाकीला धडक देणारा अज्ञात टेम्पोचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लालसाब गोवंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
एका क्षणाच्या अपघाताने कुटुंबातील दोन आधार हरपल्याने लक्केबैल आणि लोकोळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





