belgaum

तारांगणच्या कलाविष्कारातून सामाजिक संदेश;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: ओवी, भारूड, मंगळागौरीचे खेळ, फॅशन शो आणि ग्रुप डान्स अशा विविधरंगी कलाप्रकारांच्या सादरीकरणातून ‘तारांगण’चा कलाविष्कार उत्साहात पार पडला. मनोरंजनासोबतच बचत, गुंतवणूक, शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला महिलांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाला अम्फी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर निधी कामत, सामाजिक कार्यकर्त्या नेत्रा मेनसे, साहित्यिका डॉ. मनीषा नाडगोडा, उद्योजिका पूनम हांगीरगेकर आणि तारांगणच्या संस्थापिका अरुणा गोजे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. माऊली भजनी मंडळाने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. त्यानंतर तारांगणच्या केंद्र संचालिकांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुण्या निधी कामत यांनी महिलांनी बचतीसोबतच योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची गरज व्यक्त केली. गुंतवणूक करताना डोळसपणे निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळत असल्याचे त्यांनी कौतुक केले.

 belgaum

डॉ. मनीषा नाडगोडा यांनी पालकांनी मुलांच्या अभ्यासासोबतच त्यांच्या करिअरकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन केले. मुलांना वाचनाची सवय लावण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमात क्रांती महिला मंडळ, सविता मंगळागौर ग्रुप, योगा महिला मंडळ आणि तारांगण मंगळागौर ग्रुप यांनी मंगळागौरीचे विविध खेळ सादर केले. भारूडाच्या माध्यमातूनही सामाजिक प्रबोधन करण्यात आले. स्मिता किल्लेकर, सरिता सूर्यवंशी आणि कल्पना चौगुले यांनी सादर केलेल्या ओव्यांमधून समाजातील चुकीच्या प्रथा व परिस्थिती बदलण्याची गरज तसेच सामाजिक जागृतीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.

स्काय वर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ग्रुप डान्सला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. तर सरस्वती इन्फोटेकच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या फॅशन शोने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री हावळ आणि अस्मिता आळतेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र संचालिका जयश्री दिवटे, सुधा मानगावकर, सविता वेसणे, अर्चना पाटील, गीता घाडी, शारदा भेकणे आणि स्मिता मेंडके यांनी परिश्रम घेतले.

महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देतानाच बचत, योग्य गुंतवणूक, शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारा ‘तारांगण’चा हा कलाविष्कार उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.