बेळगाव लाईव्ह : यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी शांतता सभा पार पडली. यावेळी नियमांचे पालन करणाऱ्या आदर्श गणेश मंडळांसह समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सव साजरा करताना सर्वोच्च न्यायालय आणि सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी केले. या सभेला उत्तर देत उपस्थितांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या वर्षी गणेशोत्सवा दरम्यान नियमांचे पालन करून शांततेत उत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांची निवड करून त्यांना स्मृतीचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यात मंगलमूर्ती गजानन युवक मंडळ (सारापूर गल्ली, यमकनमर्डी), गजानन युवक मंडळ (कडोली गल्ली, यमकनमर्डी), बाल गजानन युवक मंडळ (उळ्ळागड्डी खानापूर), गजानन युवक मंडळ (हिडकल डॅम), श्री शिव गणेश तरुण मंडळ (पाटील गल्ली, मनगुत्ती), बाल गजानन युवक मंडळ (कलार गल्ली, यमकनमर्डी) आणि सार्वजनिक गजानन युवक मंडळ (मार्केट राज बाजार रोड, यमकनमर्डी) यांचा समावेश आहे.
समाजिक शांतता आणि सलोखा राखण्यात योगदान दिल्याबद्दल करप्पा गुडेण्णावर व त्यांची टीम (बसापूर) तसेच बंडूलाल मलिक पन्नारी (आनंदपूर, हत्तरगी) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





