belgaum

ध्वनिक्षेपकांचा मर्यादित वापर अन् लेझर लाईटवर पूर्ण बंदी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील कुमार गंधर्व कला मंदिरात पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीत उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत विविध सूचना देण्यात आल्या.

उत्सवात आगमन आणि विसर्जन करताना वेळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वतःहून निश्चित कराव्यात, असे आवाहन डीसीपी नारायण बरमणी यांनी केले. सलग ३५ ते ४० दिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती त्यांनी केली. पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य करेल, त्यामुळे कोणताही गोंधळ न होता समन्वयाने उत्सव यशस्वी करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत, तसेच महामंडळ, सर्व मंडळे आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करून शांतता राखावी, असा सल्ला रमाकांत कोंडूसकर आणि विजय जाधव यांनी दिला. उत्सवादरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 belgaum

गणेशोत्सव काळात आगमनादरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत पोलीस आयुक्तांनी योग्य मार्गदर्शन केले असल्याचे नगरसेवक गिरीश धोंडगी यांनी सांगितले. तर महामंडळाने फटाके फोडण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात आणि विजेच्या बिलात सवलत देऊन उत्सव उत्साहात साजरा करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी नामनिर्देशित नगरसेवक रमेश सोंटक्की यांनी केली.

ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी लाईव्ह टेलिकास्टसाठी एलईडी स्क्रीनची सोय करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली. रस्त्यांची दुरुस्ती, केबल हटवणे, पिण्याच्या पाण्याची सोय आणि विसर्जनासाठी मोबाईल टँकरची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत उघडी मॅनहोल्स, खराब रस्ते आणि खड्ड्यांचा प्रश्न उपस्थितांनी मांडला. महापालिका आणि संबंधित कंपन्यांनी रस्त्यांची दुरुस्ती व सुरक्षा तातडीने करावी, जेणेकरून उत्सवाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

उत्सवाच्या काळात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडपांमध्ये २४ तास किमान एका कार्यकर्त्याने उपस्थित राहावे आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असल्याचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले. तसेच काही ठिकाणी मद्यपान किंवा धूम्रपानासारखे गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी असून अशा प्रकारांना आळा घालण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उत्सवात लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. लेझर किरणांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते, असे सांगत पोलीस आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार मर्यादित आवाजातच ध्वनिक्षेपक व डॉल्बी वापरण्याचे आदेश दिले. उत्सवामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी आयोजकांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी केले. बैठकीत रमाकांत कोंडुसकर नगरसेवक रवी साळुंखे सागर पाटील विकास कलगटगी रणजीत चव्हाण पाटील, सुनील जाधव गिरीश धोंगडी गणेश दद्दीकर, शरद पाटील आदींनी सूचना मांडल्या

या बैठकीला महामंडळाचे पदाधिकारी, प्रमुख नागरिक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.