बेळगाव लाईव्ह: शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात शहरात मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून काम सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली.
महापालिका कार्यालयात सोमवारी याबाबत माहिती देताना आयुक्त कार्तिक एम. म्हणाले की, बेळगावचा गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातूनही मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यामुळे ११ दिवस शहरात मोठी वर्दळ असते. गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना आणि विसर्जनाच्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका क्षेत्रातील आवश्यक कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
गणेशमूर्ती विसर्जन तलावांची पाहणी करण्यात आली असून, तलावांची स्वच्छता, विसर्जनावेळी आवश्यक तांत्रिक व्यवस्था आणि इतर सुविधांची पूर्तता करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता करणे तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीचे मार्ग सुस्थितीत करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या सुरळीत आयोजनासाठी महापालिका पोलीस विभाग, हेस्कॉमसह विविध विभागांच्या सतत संपर्कात असून, परस्पर समन्वयाने काम केले जात आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
एक खिडकी पद्धतीने मंडळांना परवानगी
सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांना परवानगी देताना पोलीस विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. विविध विभागांच्या परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक खिडकी (Single Window) पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना वेगवेगळ्या विभागांकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी उत्सव शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडण्यासाठी महापालिका व विविध शासकीय विभागांना सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त कार्तिक एम. यांनी केले.





