बेळगाव लाईव्ह : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे झालेल्या श्री. मोहन नागप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी सौ. निशा मोहन केसरेकर यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी बेळगावात २१ ऑगस्ट रोजी शांततामय मोर्चा काढण्यात येणार आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी या मोर्चातून करण्यात येणार आहे.
बेळगावमधील मराठी समाज व मराठा समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे, IPS यांच्याकडे १९ ऑगस्ट रोजी मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली आहे.
खानापूर तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले मोहन केसरेकर (वय ४५) आणि त्यांच्या पत्नी निशा केसरेकर (वय ३५) हे रोजगारानिमित्त सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनी, एमआयडीसी परिसरात राहत होते. आरोपी फरीद अब्दुल शेख (वय ५०) याने दोघांची चाकूने वार करून हत्या केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला फास्ट-ट्रॅक न्यायालयीन प्रक्रियेतून कठोरात कठोर शिक्षा, तसेच मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
सरदार हायस्कूल मैदानापासून मोर्चा
शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सरदार हायस्कूल मैदान येथून मोर्चाला सुरुवात होणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे. याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादण्यात येणार आहे.

मोर्चा पूर्णपणे शांततामय, कायदेशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही देण्यात आली आहे.
या मोर्चासाठी रमाकांत कोंडुस्कर, सागर पाटील, गुणवंत पाटील, हरी शानभाग आणि कपिल भोसले यांच्यासह मराठी व मराठा समाजातील कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.
केसरेकर दाम्पत्याच्या हत्येतील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी आणि प्रकरणाचा जलदगतीने न्यायालयीन निकाल लागावा, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.





