belgaum

दक्षिण आमदारांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात सत्याग्रह;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : काँग्रेसचे मंत्री बी. नागेंद्र यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपकडून राजीनाम्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहोरात्र आंदोलन सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला बेळगाव दक्षिण मतदारसंघातील दक्षिण आमदारांच्या कथित भ्रष्टाचार व उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्याग्रह आंदोलन सुरू केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कन्नड साहित्य भवनासमोर बुधवारी बेळगाव शहरातील रहिवाशांच्या वतीने हे धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, राजकुमार टोपणनावर यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

यावेळी बोलताना सुजित मुळगुंद यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मंत्री नागेंद्र यांच्या भ्रष्टाचाराविरोधात बोलणाऱ्या दक्षिण आमदारांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का?” असा सवाल त्यांनी केला.

 belgaum

दक्षिण आमदारांविरोधात मागील अनेक वर्षांपासून कथित अवैध मालमत्ता व भ्रष्टाचारासंदर्भात लोकायुक्त तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचा दावा मुळगुंद यांनी केला. या प्रकरणातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत असून त्याबाबत अंतिम निर्णय न्यायालयाकडूनच स्पष्ट होईल.

“भाजपने मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यापूर्वी आपल्या पक्षातील दक्षिण आमदारांविरोधातील आरोपांवर भूमिका स्पष्ट करावी. दक्षिण आमदारांचा राजीनामा घेऊन त्यांच्याविरोधातही भाजपने आंदोलन करावे. तसेच त्यांना पक्षातून बाहेर काढावे,” अशी मागणी मुळगुंद यांनी केली.

यावेळी दक्षिण आमदारांविरोधात कथित अनधिकृत मायनिंग, शेतकरी व सरकारी जमिनींसंदर्भातील आरोप, विविध संस्थांच्या आर्थिक व्यवहारांसह शहरातील काही सार्वजनिक प्रकल्पांच्या दुरवस्थेचे मुद्देही आंदोलकांनी उपस्थित केले.

स्लम बोर्डाच्या सुमारे १७०० घरकुलांपैकी केवळ २०० हून अधिक घरकुलांचे वाटप झाले असून उर्वरित घरकुले अनेक वर्षांपासून पडून असल्याचा दावा करण्यात आला. तसेच कला भवन आणि खासबाग भाजी मार्केटच्या सद्यस्थितीबाबतही आंदोलकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाब विचारला.

राजकुमार टोपणनावर यांनीही भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी भूमिकेवर टीका केली. “भाजप नेते राज्यभर मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र, आपल्या पक्षातील दक्षिण आमदारांविरोधातील आरोपांवर ते मौन का बाळगतात? भाजपला खरोखरच भ्रष्टाचाराविरोधात लढायचे असेल, तर आधी दक्षिण आमदारांचा राजीनामा घेऊन दाखवावा,” असे आव्हान त्यांनी दिले.

यावेळी अनिल उपरी, युवराज तळवार, साद्दाम तहसीलदार, सिद्धार्थ चौहान, सचिन तळवार, सलीम सनदी, आनंद पूजारी, बलराम संगोळी, आसिफ मुल्ला, आशीष पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकाचवेळी सुरू असलेल्या या दोन आंदोलनांमुळे बेळगावच्या राजकीय वर्तुळात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा उधाण आले आहे. आंदोलनकर्त्यांनी लवकरच बेळगाव दक्षिण मतदारसंघातून पदयात्रा आंदोलन सुरू करण्याचा इशाराही दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.