belgaum

गांजा, मटका आणि अवैध दारू विक्रीवर छापे

0
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहर पोलिसांनी अमली पदार्थ, मटका-जुगार आणि अवैध दारूविक्रीविरोधात सलग कारवाई करत तीन वेगवेगळ्या प्रकरणांत कारवाई केली आहे. या कारवाईत गांजा विक्रीच्या प्रयत्नातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून मटका-जुगार प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अवैध दारूविक्रीप्रकरणीही एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.

गांजा विक्रीच्या प्रयत्नात एकाला अटक

सीसीबी विभागाच्या पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी रामतीर्थ नगर येथील केएससीए मैदानाजवळ कारवाई केली. अक्तार युसूफ शेख (४२), रा. रुक्मिणी नगर, बेळगाव हा गांजा विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला.

सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. आरोपीकडून १ किलो १४८ ग्रॅम गांजा, अंदाजे ५५ हजार रुपये किमतीचा, तसेच २० हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा, असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 belgaum

याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

काकती पोलिसांची मटका-जुगाराविरोधात कारवाई

काकती पोलिसांनी देवगिरी गावातील स्मशानभूमीजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मटका-जुगारावर छापा टाकला. भरमप्पा वैजप्पा कुंभारगी (२८), रा. ब्रह्मलिंगेश्वर गल्ली, देवगिरी, बेळगाव हा अंकांवर पैसे लावून ओसी-मटका जुगार खेळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पीएसआय मंजुनाथ नाईक आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई करून आरोपीकडून रोख रक्कम, ओसी चिठ्ठ्या आणि पेन जप्त केले. काकती पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायदा १९६३ मधील कलम ७८(III) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध दारूविक्रीवरही छापा

मारिहाळ पोलिसांनी चंदूर गावातील होळेम्मादेवी ढाब्याजवळ अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. बाळाप्पा द्यामाप्पा निट्टूर (४२), रा. सोमणट्टी, बेळगाव हा कोणतीही परवानगी नसताना दारू विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले.

एएसआय बी. एस. नाईक आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकून डी.के. डबल किक नीट व्हिस्कीचे ९० मिलीचे ८८ टेट्रा पाऊच जप्त केले. याप्रकरणी कर्नाटक अबकारी कायद्यानुसार कलम ३२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अमली पदार्थांची विक्री, मटका-जुगार आणि अवैध दारूविक्रीविरोधात केलेल्या या कारवायांबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी संबंधित पीआय, पीएसआय, एएसआय तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.