बेळगाव लाईव्ह विशेष : उत्तर कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय केंद्र असलेल्या बेळगाव शहराची हवाई वाहतूक व्यवस्था आज अत्यंत चिंताजनक व गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे. सन १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानून स्थापन केलेले ऐतिहासिक सामरा विमानतळ आज एकाकी पडताना दिसत आहे. अवघ्या पाच वर्षांपूर्वी ज्या विमानतळावरून दररोज विमानांची वर्दळ आणि प्रवाशांचा गजबजाट असायचा, तेच विमानतळ आज ओस पडण्याच्या मार्गावर का आले, हा प्रश्न केवळ विमान प्रवासापुरता मर्यादित नसून तो बेळगावच्या सर्वांगीण आर्थिक, औद्योगिक व व्यापारी भवितव्याशी थेट जोडलेला आहे.
याबाबत केलेल्या सर्वेक्षणानुसार पाच वर्षांपूर्वी इंडिगो, स्टार एअर, एअर इंडिया एक्सप्रेस, स्पाइसजेट आणि ट्रूजेट अशा तब्बल पाच प्रमुख विमान कंपन्या बेळगावमधून नियमित सेवा देत होत्या. त्या वेळी शहरातून मुंबई, पुणे, जयपूर, अहमदाबाद, सुरत, इंदूर, तिरुपती, चेन्नई आणि नागपूरसह तब्बल १३ हून अधिक शहरांसाठी दररोज २० ते २५ उड्डाणे होत असत. मात्र आज हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. या पाच कंपन्यांची जागा आता केवळ इंडिगो या एकाच कंपनीने घेतली असून दैनंदिन उड्डाणे अवघ्या ३ ते ४ वर सीमित झाली आहेत. सध्या केवळ दिल्ली, नवी मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू या चार शहरांसाठीच नाममात्र सेवा उपलब्ध आहे. वार्षिक तीन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची नोंद होऊनही विमानांची संख्या घटणे, ही बाब व्यावसायिक संभाव्यतेपेक्षा धोरणात्मक अपयशाकडेच बोट दाखवते.
या घसरणीमागे केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेचा व्यापारी गैरफायदा आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता ही प्रमुख कारणे आहेत. ‘उडान’ योजनेअंतर्गत प्रादेशिक हवाई जोडणी वाढवण्यासाठी विमान कंपन्यांना सुरुवातीची काही वर्षे सरकारकडून आर्थिक अनुदान दिले जाते. बेळगावच्या बाबतीत अनेक कंपन्यांनी हे अनुदान मिळेपर्यंतच सेवा पुरवली आणि अनुदान संपताच अथवा इतरत्र नवीन उड्डाणमार्ग उपलब्ध होताच नफ्याच्या शोधात उड्डाणे बंद करून इतर ठिकाणी स्थलांतर केले. स्टार एअरसारख्या कंपन्यांनी जयपूर, अहमदाबाद आणि मुंबईचे मार्ग टप्प्याटप्प्याने बंद केल्याने स्थानिक उद्योजकांमध्ये तीव्र असंतोष आहे. दुसरीकडे बेळगाव आणि शेजारच्या हुबळी या दोन्ही शहरांनी अत्यंत महत्त्वाची थेट उड्डाणे गमावली असताना, केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे आवश्यक तो राजकीय दबाव आणण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि खासदार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा आरोप नागरीकातून होत आहे.

दुसरीकडे भारतीय विमानतळ प्राधिकरनाने कोट्यवधी रुपये खर्चून बेळगाव विमानतळाच्या नव्या व भव्य टर्मिनल इमारतीचा विस्तार केला आहे. एकाच वेळी शेकडो प्रवाशांना हाताळण्याची क्षमता येथे निर्माण केली जात असली, तरी इमारत भव्य आणि चकचकीत मात्र आत विमानेच नाहीत असा अत्यंत विरोधाभासी प्रकार आज बेळगावकरांना अनुभवायला मिळत आहे. बेळगाव हे ऑटोमोबाईल सुटे भाग, वस्त्रोद्योग, फाउंड्री उद्योग आणि वैद्यकीय पर्यटनाचे मोठे केंद्र असल्याने मुंबई, पुणे, गुजरात आणि राजस्थानशी असलेली थेट जोडणी तुटल्यामुळे देशांतर्गत व परदेशी गुंतवणूकदार बेळगावमध्ये येणे टाळत आहेत. त्यामुळे व्यापारी आणि प्रवाशांना आता दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गोवा, हुबळी किंवा कोल्हापूर विमानतळांवरून उड्डाणे पकडावी लागत असून वेळ आणि पैसा या दोन्ही बाबींचा मोठा अपव्यय होत आहे.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, कापड व्यावसायिक संघटना आणि स्थानिक नागरिक निवेदने देऊन नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे सातत्याने दाद मागत आहेत. आता हुबळी आणि बेळगाव या दोन्ही शहरांचा समावेश केंद्र सरकारच्या नवीन नागरी हवाई मार्गांमध्ये प्राधान्याने केला जाणे गरजेचे आहे. तसेच उडान योजनेचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांवर विशिष्ट कालावधीसाठी उड्डाणमार्ग कायम ठेवण्याबाबत कायदेशीर अटी घालून मुंबई, पुणे, अहमदाबाद, जयपूर आणि बंगळुरूसाठी दैनंदिन उड्डाणे तात्काळ पूर्ववत करण्याची अत्यंत गरज आहे.
सांबरा विमानतळाची ही घसरण केवळ विमानांची संख्या कमी होणे नसून ती बेळगावच्या विकासाची गती रोखणारी बाब आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन बेळगावची हवाई वाहतूक पुन्हा पूर्ववत करणार की बेळगावला देशाच्या हवाई नकाशावरून कायमचे दुर्लक्षित राहू देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





