बेळगाव लाईव्ह : बडेकोळमठ परिसरातील वारंवार होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तात्पुरत्या सुरक्षा उपाययोजना राबविल्या असून, पावसाळा संपल्यानंतर कायमस्वरूपी कामाला सुरुवात केली जाणार आहे. याबाबतची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
बडेकोळमठ परिसरातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी यापूर्वी संबंधितांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार NHAI ने आवश्यक कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. पावसाळा संपताच या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, अपघात टाळण्यासाठी NHAI कडून तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचे ड्रम, सुरक्षा कोन्स, मानवी आकृतीचे रिफ्लेक्टर तसेच इशारा देणारे फलक संपूर्ण अपघातप्रवण पट्ट्यात बसविण्यात आले आहेत. वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी NHAI सोबत समन्वय साधून वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
या संयुक्त प्रयत्नांमुळे बडेकोळमठ परिसरातील अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी व्यक्त केला.





