बेळगाव लाईव्ह : बनावट कागदपत्रे तयार करून स्वतःला मालमत्तेची मूळ मालकीण असल्याचे भासवत उपनोंदणी कार्यालयात हक्कत्यागपत्र (रिलीज डीड) नोंदवून फसवणूक केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.
31 मे 2025 रोजी दीपक मारुती इंजळ (रा. शिवबसव नगर, बेळगाव) यांनी स्वतःच्या आणि बहिणी कविता यांच्या नावावरील मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री झाल्याची तक्रार मार्केट पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक 97/2025 अंतर्गत विविध कलमांनुसार तपास सुरू होता.
तपासादरम्यान शुभांगी विजय सुलेभावीकर (वय 37, रा. पाटील गल्ली, पीरणवाडी) हिने कविताच्या नावाने स्वतःला मूळ मालकीण असल्याचे भासवून उपनोंदणी कार्यालयात हजर राहत वेबकॅमेऱ्यासमोर छायाचित्र काढून अंगठ्याचा ठसा देत मालमत्तेचे हक्कत्यागपत्र (रिलीज डीड) इतर आरोपींच्या नावे नोंदवून तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणात स्मिता सतीश इंजळ, सृतिका सतीश इंजळ, युवराज मल्लाप्पा पाटील, जी. जी. गीवरगीसे, शंकर शिवप्पा पालकर तसेच इम्राना मिर्शकोटी यांचा सहभाग असल्याचेही तपासात समोर आले आहे.
मार्केट पोलिसांनी शुभांगी सुळेभावीकर हिला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक करणारे मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची व त्यांच्या पथकाचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.





