बेळगाव लाईव्ह : अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना सातत्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि दुष्काळ व्यवस्थापनाशी संबंधित कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते. ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मजुरांना अखंडित रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.
राहुल शिंदे म्हणाले की, सध्या पुरेसा पाऊस नसल्याने ग्रामीण भागात रोजगाराची गरज वाढली आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये मंजूर कामे उपलब्ध नाहीत, त्यांनी तातडीने किमान पाच नवीन कामांचा कृती आराखडा तयार करून जिल्हा परिषदेकडे सादर करावा. अशा कामांना प्राधान्याने मंजुरी दिली जाईल.
दुष्काळ निवारणाशी संबंधित कामांना प्रथम प्राधान्य देत मजुरांचे स्थलांतर होऊ नये यासाठी सातत्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच, कायमस्वरूपी उपजीविकेला हातभार लावणाऱ्या कामांनाही प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या योजनेअंतर्गत ३१८ प्रकारची कामे हाती घेण्याची परवानगी असून, जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविका वाढ, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यांसारखी विविध विकासकामे राबविता येणार आहेत. या संधीचा प्रभावी वापर करून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.

ग्रामीण भागातील गोचर जमिनींची ओळख पटवून जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या. तसेच वन आणि कृषी विभागाकडून मंजूर झालेली कामे तातडीने सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले.
शिक्षण, महिला व बालविकास, आरोग्य, कृषी, फलोत्पादन, वन आणि पशुसंवर्धन विभागांची विविध कामेही या योजनेअंतर्गत राबविता येणार असल्याने सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रभावी नियोजन करावे, असेही राहुल शिंदे यांनी स्पष्ट केले.
बैठकीला जिल्हा परिषद नियोजन संचालक रवी बंगारप्पणवर, कृषी विभागाचे संयुक्त संचालक एच. डी. कोळीकर, फलोत्पादन विभागाचे संयुक्त संचालक महांतेश मुरगोड, महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक चेतनकुमार, डीडीपीआय लीलावती हिरेमठ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ईश्वर गडाद, उपवनसंरक्षक राजेश्वरी ईरनट्टी यांच्यासह विविध विभागांचे जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.





