बेळगाव लाईव्ह : निपाणीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील उड्डाणपुलाच्या भरावाचा काही भाग मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना समोर आल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) याबाबत अधिकृत खुलासा केला आहे. या घटनेचा मुख्य महामार्गाशी कोणताही संबंध नसून, वाहतुकीवरही परिणाम झालेला नसल्याचे NHAI ने स्पष्ट केले आहे.
NHAI च्या बंगळुरू प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाण हे संकेश्वर बायपास ते महाराष्ट्र सीमेपर्यंत सुरू असलेल्या NH-48 प्रकल्पातील हलक्या वाहनांसाठीच्या अंडरपास (LVUP) च्या अॅप्रोच भरावाचे बांधकाम सुरू असलेले ठिकाण आहे. येथे अद्याप Pavement Quality Concrete (PQC) टाकण्यात आलेले नव्हते. काम सब-ग्रेड स्तरावर सुरू होते आणि Dry Lean Concrete (DLC) चे कामही अंशतः पूर्ण झाले होते.
NHAI च्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे अपूर्ण सब-ग्रेडमधून पाण्याचा जोरदार प्रवाह गेल्याने सुमारे ७ ते १० मीटर लांबीचा अॅप्रोच भराव वाहून गेला.

प्राधिकरणाने स्पष्ट केले की, या ठिकाणी मुख्य मार्गावरील वाहतूक सुरूच नव्हती. बांधकाम सुरू असल्याने वाहनांची वाहतूक आधीपासूनच सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली होती. त्यामुळे या घटनेचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
NHAI ने नुकसानग्रस्त भरावाची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असून, शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करून बांधकाम पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, भराव खचल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महामार्गाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर NHAI ने अधिकृत स्पष्टीकरण देत ही घटना केवळ बांधकाम सुरू असलेल्या अॅप्रोच भरावापुरती मर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे.





