बेळगाव लाईव्ह : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सर्व इच्छुकांना मंत्रिपद देणे शक्य नसल्याने एकाला मंत्रिपद आणि दुसऱ्याला विधानसभा उपसभापती (डेप्युटी स्पीकर) पद देण्याचा पर्याय काँग्रेस नेतृत्वाने पुढे केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेते सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी आणि अशोक पटन यांच्यासोबत चर्चा करून मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व इच्छुकांना मंत्रिपद मिळणे शक्य नसल्यामुळे समन्वयाचा मार्ग म्हणून उपसभापतीपदाचा प्रस्ताव पुढे आल्याचे बोलले जात आहे.
सध्या बेळगाव जिल्ह्यात लक्ष्मी हेब्बाळकर, लक्ष्मण सवदी आणि अशोक पटन हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्याचबरोबर महांतेश कौजलगी यांच्या नावाचीही नव्या चेहऱ्याच्या रूपात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील मर्यादित मंत्रिपदांसाठी ५० हून अधिक आमदार इच्छुक असल्याने बेळगावला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे. त्यामुळे एक मंत्रिपद आणि एक उपसभापतीपद असा तोडगा निघू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मात्र, या सर्व घडामोडींवर अंतिम शिक्कामोर्तब काँग्रेस हायकमांडकडून होणार आहे. अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत विविध दावे, प्रतिदावे आणि राजकीय तर्कवितर्क सुरूच राहणार आहेत.
दरम्यान, बेळगाव हा राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा जिल्हा असल्याने जिल्ह्याला आणखी एक मोठे पद मिळण्याची शक्यता कायम आहे. आता मंत्रिपदाची संधी कोणाला मिळणार आणि उपसभापतीपद कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





