बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील पाणीटंचाईचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याच्या मागणीसाठी बेळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागातील, विशेषतः बेळगाव शहरातील वाढती पाणीटंचाई दूर करण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळविण्याचा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयावर यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाली असली तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.
शिष्टमंडळाने आमदार शिवाजीराव पाटील यांना सांगितले की, तिलारी धरणातून वीजनिर्मितीनंतर उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्यात आल्यास बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. तसेच हे पाणी मार्कंडेय नदीत सोडल्यास नदी वर्षभर प्रवाहित राहण्यास मदत होईल आणि सीमाभागातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी मोठा दिलासा मिळू शकेल.
यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्य सरकारांनी समन्वयाने पुढाकार घेणे आवश्यक असून, विशेषतः महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बेळगाव शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून, आपण या प्रश्नाचा पाठपुरावा करून दोन्ही राज्यांच्या सरकारकडे प्रभावीपणे मांडणी करावी, अशी विनंतीही आमदार शिवाजीराव पाटील यांना करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक संघटनेचे माजी महापौर शिवाजी सुंठकर, दीपक वाघेला, अमर येळ्ळूरकर, सुनील बाळेकुंद्री आणि संजय पाटील कल्लेहोळ उपस्थित होते. शिष्टमंडळाने बेळगावच्या दीर्घकालीन पाणीप्रश्नाच्या निराकरणासाठी या विषयात तातडीने हालचाल करण्याची अपेक्षा व्यक्त केली.





