बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये ‘शिवम असोसिएट्स’ आणि ‘आदित्याराज कॅपिटल’मधील कोट्यवधींच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर आता हळूहळू अनेक कंपन्या पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या रडारवर येत असून, या यादीत आता ‘अॅपेक्स बिझकॉर्प’ या नव्या कंपनीचे नाव जोडले गेले आहे.
महिन्याला आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे ३ हजारहून अधिक लोकांची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘अॅपेक्स बिझकॉर्प एलएलपी’ या कंपनीविरुद्ध बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करून पैसे वसूल करून देण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.
संबंधित कंपनीने रिअल इस्टेट, फिक्स डिपॉझिट आणि ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून सर्वसामान्यांकडून ५० हजार रुपयांपासूनपुढील रकमा गुंतवून घेतल्या होत्या. गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा ४ टक्के कमिशन किंवा परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.
विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीने २०२५ मध्ये बेळगावच्या गांधी भवन येथे कंपनीच्या चौथ्या वर्धापनदिनाचा मोठा कार्यक्रमही आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भुलून अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी यात गुंतवली.
गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या व्यवस्थापनाकडून गुंतवणूकदारांना कोणताही परतावा मिळालेला नाही, तसेच त्यांची मुद्दल रक्कमही परत केलेली नाही. कंपनीच्या संचालकांनी आणि व्यवस्थापनाने गुंतवणूकदारांचे फोन उचलणे आणि संपर्क साधणे बंद केले आहे. कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ महादेव वाघमारे हे दुबईला पळून गेल्याचा आणि तिथे ‘अॅपेक्स बिझकॉर्प इक्विपमेंट ट्रेडिंग एलएलसी’ नावाने अशीच दुसरी कंपनी चालवत असल्याचा संशय गुंतवणूकदारांनी व्यक्त केला आहे. तर दुसरे संचालक गणेश परशुराम भंडारे हे भारतातच असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या अचानक झालेल्या फसवणुकीमुळे शेकडो कुटुंबे अडचणीत आली आहेत. गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात या आर्थिक घोटाळ्याची तातडीने उच्चस्तरीय चौकशी सुरू करावी, कंपनीचे संचालक, व्यवस्थापक आणि त्यांच्या नातेवाइकांची बँक खाती, ट्रेडिंग खाती आणि डीमॅट खाती तात्काळ गोठवावीत, आरोपींची मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर परत मिळवून द्यावेत, अशा मागण्या केल्या आहेत.
गुंतवणूकदारांनी या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणि प्रशासनाला बँक व्यवहारांचे पुरावे, व्हॉट्सअॅप चॅट्स आणि व्हिडिओ देण्याची तयारी दर्शवली आहे. या नव्या घोटाळ्यामुळे बेळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.





