बेळगाव लाईव्ह: महाराष्ट्रात 50 हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेल्या दोन आंतरराज्य सराईत चोरांना बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी अटक करत मोठे यश मिळवले आहे. आरोपींनी बेळगावातील श्रीनगर परिसरात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहन दौलतराव मुंडे (33, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई, जि. बीड) आणि श्याम साहेबराव जाधव (30, रा. भवताणा, ता. अंबाजोगाई, जि. बीड) अशी आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून 1,617 ग्रॅम वजनाचे 3.88 लाख रुपयांचे चांदीचे दागिने आणि 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, असा एकूण 4.18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासादरम्यान आरोपींवर महाराष्ट्रातील बीड, लातूर, पुणे, सोलापूर, विजयपूर आदी भागांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 50 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. महाराष्ट्रात अनेक घरफोड्या केल्यानंतर त्यांनी प्रथमच कर्नाटकमध्ये चोरी केली होती. मात्र, माळमारुती पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.
ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि तांत्रिक विभागाच्या समन्वयातून ही यशस्वी कारवाई पार पडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.





