belgaum

तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावकरांनी सहभागी व्हावे

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे २३ सप्टेंबर २०२६ रोजी राजे सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांचे बेळगावात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. कॉलेज रोडवरील यश ऑटोच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमात दक्षिण भारतातील पहिल्या मराठी साहित्य संमेलनाबाबत साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता व्यक्त करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष डॉ. शरद गोरे, युवराज संभाजीराजे भोसले, कवी किशोर टिळेकर आणि अजय साळुंखे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील होते.

युवराज संभाजीराजे भोसले यांनी बेळगावसह कर्नाटकातील मराठी बांधवांना २३ सप्टेंबर रोजी तंजावर येथे होणाऱ्या ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव वाढविण्यासाठी या संमेलनात प्रत्येक मराठीप्रेमीने उपस्थित राहावे, असे त्यांनी सांगितले.

 belgaum

कार्यक्रमाच्या प्रारंभी उद्योजक महादेव चौगुले यांनी प्रास्ताविक करत तंजावर साहित्य संमेलनाचे महत्त्व विशद केले. यश ऑटोचे संचालक शिवसंत संजय मोरे यांनी युवराज संभाजीराजे भोसले यांना स्मृतिचिन्ह व राजमुद्रा प्रदान करून गौरव केला. तसेच एशियन मशिन ऑलिम्पिक गेम्स संघटनेचे कर्नाटक राज्याध्यक्ष पै. अतुल शिरोळे यांनीही राजेंचा सत्कार केला.

यावेळी उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि राजेंद्र मुतगेकर यांचाही युवराज संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

डॉ. शरद गोरे म्हणाले, “तंजावर ही दक्षिणेतील मराठी संस्कृतीची पंढरी आहे. राजे सरफोजीराजे भोसले यांच्या स्मृतीत होणारे हे साहित्य संमेलन मराठी भाषा, संस्कृती आणि इतिहासासाठी अभिमानाचा क्षण आहे.”

कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी तंजावर साहित्य संमेलनामुळे महाराष्ट्र आणि तंजावर यांच्यातील सांस्कृतिक नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. देशभरातील साहित्यिक, संशोधक, इतिहासप्रेमी आणि मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठी साहित्याचा झेंडा तंजावरच्या भूमीत अभिमानाने फडकवावा, असे आवाहन त्यांनी केले.

परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी बेळगावातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी या संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती दिली.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक एम. के. पाटील, रणजित चौगुले, संदीप तरळे, तानाजी पाटील, अरुणा गोजे-पाटील, कवयित्री पूजा सुतार, स्मिता मेंडके, सविता वेसणे, बेळगाव जिल्हा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, शिवसंदेश भारत समूहाचे सदस्य, यश ऑटो परिवार तसेच अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.

दक्षिण भारतातील पहिले मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमातून राजे सरफोजीराजे भोसले यांच्या कार्याचा गौरव होण्याबरोबरच मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा देशभर पोहोचेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.