बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील हिरा टॉकीज आणि भातकांडे गल्ली परिसरात युवा सामाजिक कार्यकर्ते निहाल शहापूरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या साथीने अस्वच्छता दूर करत परिसर चकाचक केला.
हिरा टॉकीज समोरील परिसर, भातकांडे गल्ली आणि चिंच मार्केटला जोडणाऱ्या रस्त्यावर अनेक वर्षांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. या समस्येची दखल घेत निहाल शहापूरकर यांच्या पुढाकाराने गुरुवारी सकाळी या भागात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसरातील साचलेला कचरा आणि प्लास्टिक पूर्णपणे हटवले. त्यानंतर पाण्याचे टँकर आणि हाय-प्रेशर गन मशीनचा वापर करून संपूर्ण रस्ता धुवून स्वच्छ करण्यात आला.

या मोहिमेत महानगरपालिकेचे सुपरवायझर मोहन साकत यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उतरून स्वच्छता केली. या कामात स्थानिक नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, नागरिक आनंद भातकांडे, सूर्यकांत गोडसे, राजू लोहार आणि श्रीपाद भातकांडे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला हा परिसर स्वच्छ झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरात अशाच प्रकारे इतर भागांतही स्वच्छता उपक्रम राबवण्याची गरज असल्याचे मत निहाल शहापूरकर यांनी व्यक्त केले.





