बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली आणि भातकांडे गल्ली परिसरातील भंगीबोळात गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही या भागातील कचरा उचलला जात नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या परिसरात एका जुन्या पडक्या घराच्या जागेत शेजारील गणपती गल्लीतील फळ विक्रेते आणि व्यावसायिक कुजलेला माल व कचरा टाकत आहेत. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या अस्वच्छतेमुळे डेंग्यूसारख्या आजारांची भीती निर्माण झाली असून शाळकरी मुले व लहान मुले वारंवार आजारी पडत आहेत.
या संदर्भात बोलताना स्थानिक रहिवासी निहाल शहापूरकर यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून नागरिक या समस्येचा सामना करत आहेत. आमदार असिफ सेठ यांच्या माध्यमातून अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली काही प्रमाणात कचरा साफ करण्यात आला होता.
मात्र, या बोळात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या एका विजेच्या खांबामुळे कचरा पूर्णपणे हटवण्यासाठी जेसीबी गाडी आत येऊ शकत नाही. याबाबत ‘हेस्कॉम’ प्रशासनाला वीज खांब हटवण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. मात्र याकडे हेस्कॉम आणि मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले असून यावर स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

या परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या स्थानिक महिला रहिवाशांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. घरात राहणे असह्य झाले असून मुलांच्या आरोग्याशी खेळ मांडला गेल्याचे महिलांचे म्हणणे आहे.
महानगरपालिका आणि हेस्कॉम प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन येथील वीज खांब तात्काळ स्थलांतरित करावा आणि कचरा कायमचा हटवावा. अन्यथा, संपूर्ण गल्लीतील महिला आणि नागरिक एकत्र येऊन बोळातील संपूर्ण कचरा थेट महानगरपालिकेच्या दारात ओततील, असा आक्रमक इशारा रहिवाशांनी दिला आहे.




