belgaum

मुंबई–बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर’मुळे बेळगावकरांना मोठा दिलासा?

0
Vande bharat
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मुंबई आणि बंगळुरूदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या बेळगावसह सीमाभागातील हजारो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई–केएसआर बंगळुरू मार्गावर धावणारी देशातील दुसरी ‘वंदे भारत स्लीपर’ रेल्वे अंतिम चाचणी टप्प्यात असून, सर्व मंजुरीनंतर लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.


या रेल्वेमुळे विशेषतः बेळगाव, हुबळी-धारवाड, पुणे आणि मुंबईदरम्यान व्यावसायिक, विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी तसेच वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहे. रात्रीचा प्रवास अधिक सुखकर होऊन वेळेचीही बचत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) आणि चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या स्लीपर ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर इतका आहे. रेल्वेत 16 डबे असून एकूण 823 प्रवाशांची क्षमता आहे. यात 11 एसी थ्री-टियर, 4 एसी टू-टियर आणि एक फर्स्ट एसी डबा समाविष्ट आहे.

 belgaum


प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘कवच’ स्वयंचलित सुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही, डिजिटल माहिती प्रणाली, जैविक शौचालये, कमी आवाज आणि कंपन करणारी रचना तसेच लोको पायलटशी थेट संपर्क साधण्यासाठी ‘टॉक-बॅक’ सुविधा देण्यात आली आहे.


देशातील पहिली वंदे भारत स्लीपर रेल्वे हावडा–कामाख्या मार्गावर सुरू झाल्यानंतर आता मुंबई–बंगळुरू मार्गावरील ही दुसरी स्लीपर सेवा अंतिम चाचणी टप्प्यात आहे. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर भारतीय रेल्वेकडून अधिकृत उद्घाटनाची घोषणा अपेक्षित असून, सीमाभागातील प्रवाशांच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.