बेळगाव लाईव्ह : मालमत्ता खरेदी-विक्री, दस्त नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नागरिकांना आता रविवारीही शासकीय सेवा उपलब्ध होणार आहे. कर्नाटक सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत येत्या रविवार, १२ जुलै २०२६ रोजी राज्यातील सर्व उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) कार्यालये नियमितपणे सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
सामान्यतः रविवार हा सरकारी सुटीचा दिवस असतो. मात्र, कर्नाटक सरकारने कर्नाटक नोंदणी नियम, १९६५ मधील नियम ५ मध्ये सुधारणा करून या विशिष्ट रविवारी सुटी रद्द केली असून, तो दिवस कामाचा दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे बेळगावसह राज्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयांमध्ये नियमित व्यवहार सुरू राहतील.
या निर्णयामुळे मालमत्ता नोंदणी, विक्रीखत, भेटपत्र, गहाणखत, मुद्रांक शुल्क भरणे तसेच इतर नोंदणीसंदर्भातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त दिवस उपलब्ध होणार आहे. विशेषतः आठवडाभर कार्यालयीन वेळेत येणे शक्य नसलेल्या नोकरदार, व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.
महसूल विभागाने नागरिकांना या विशेष संधीचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित उपनिबंधक कार्यालयात वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे रविवारीही नोंदणीची सर्व नियमित कामे पूर्ववत सुरू राहणार आहेत.





