belgaum

वरुणराजाची आठवडाभरानंतर विश्रांती, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या आठ दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसराला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाने गुरुवारी अखेर विश्रांती घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे.

जिल्ह्यात सलग आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यातच मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या भागांना मोठा फटका बसला, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली होती.

पावसाच्या संततधारेनंतर आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे सखल भागातील साचलेले पाणी वेगाने ओसरू लागले असून नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढल्याने गेले काही दिवस चिंतेत असलेल्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 belgaum

पाणी ओसरलेल्या पूरग्रस्त भागात महानगरपालिकेने तात्काळ स्वच्छता मोहीम हाती घेतली असून रस्त्यांवरील गाळ उपसणे, कचरा हटवणे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हवामान खात्याच्या नोंदीनुसार मागील २४ तासांत बेळगाव शहर आणि तालुक्यात १८.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील सर्वाधिक ४२ मिलिमीटर पाऊस खानापूर तालुक्यात झाला आहे. सद्यस्थितीत पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने पुढील काही दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क असून नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.