बेळगाव लाईव्ह : राज्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने दौरा सुरू केला असून, त्याचाच एक भाग म्हणून आज बेळगाव येथे भेट दिल्याची माहिती मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिली.
गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवकुमार म्हणाले की, राज्यातील विविध जिल्ह्यांतील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक अडचणी समजून घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याची सुरुवात बसवकल्याण येथून झाली असून, त्यानंतर बीदर आणि कलबुर्गी मार्गे ते बेळगाव येथे दाखल झाले आहेत.
ते पुढे म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यासाठी सरकारचे मंत्रीही येथे उपस्थित आहेत. जिल्ह्यातील आमदारांकडून स्थानिक समस्या, नागरिकांच्या मागण्या तसेच विकासकामांबाबत माहिती घेतली जाणार असून, त्यानंतर संबंधित विषयांवर आवश्यक निर्णय घेण्यात येतील.

राज्य सरकार नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या भूमिकेत असल्याचे सांगत, प्रत्येक जिल्ह्याच्या गरजेनुसार विकास आणि प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
बेळगाव जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, अलीकडील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती, विकासकामे तसेच नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांवरही या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.





