belgaum

विणकामातून महिला सक्षमीकरण!आशा पत्रावळींना राष्ट्रीय पुरस्कार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : हातातील सुया, धाग्यांची गुंफण आणि त्यातून साकारलेली कलाकुसर… विणकाम ही केवळ एक कला न राहता महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे साधन बनावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या बेळगावच्या आशा पत्रावळी यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

विणकाम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ‘भारतीय राष्ट्रगौरव २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील ग्लोबल पीस कौन्सिलतर्फे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विणकामासारख्या पारंपरिक कलेला आधुनिक दृष्टिकोनाची जोड देत आशा पत्रावळी यांनी या क्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. विणकामाची कला अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावी, त्यांना या कलेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने त्यांनी सातत्याने काम केले आहे.

 belgaum

विशेष म्हणजे, विणकाम विषयावर पुस्तके लिहून त्यांनी या कलेचे ज्ञान शब्दबद्ध केले आहे. अनेक विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांना विणकामाचे प्रशिक्षण देत त्यांनी त्यांच्यात कौशल्य विकसित करण्याबरोबरच आर्थिक स्वावलंबनाची उमेद निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे विणकाम ही केवळ छंदापुरती मर्यादित न राहता उत्पन्नाचे साधन बनू शकते, हा विश्वास अनेक महिलांमध्ये निर्माण झाला आहे.

समाजाला प्रेरणा देणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेण्यासाठी भारतीय राष्ट्रगौरव पुरस्कार दिला जातो. सामाजिक सेवा, शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण, नवकल्पना, उद्योजकता तसेच कला आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील योगदानाचा या उपक्रमातून गौरव केला जातो.

आशा पत्रावळी यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या कलात्मक कौशल्याची आणि महिलांना सक्षम बनविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची राष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल आहे. स्वतःच्या कौशल्यातून इतर महिलांसाठी प्रगतीच्या वाटा खुल्या करणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.